Advertisement
मराठी संगीत क्षेत्रात सध्या अनेक बदल होत आहेत. पारंपरिक संगीताचा वसा जपतानाच नव्याचं स्वागत करणारे प्रेक्षक निर्माण होत आहेत आणि त्याच बरोबरीने त्यांच्यापर्यंत आजच्या युगाची सांगितीक भाषा पोहचवणारे संगीतकारही निर्माण होत आहेत.अविनाश-विश्वजीत हे देखील त्याचपैकी एक नाव!
या वर्षीच प्रदर्शित झालेल्या मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटातलं अनोखं संगीत अनेक रसिकांच्या कानात अजुनही रुंजी घालतंय. अविनाश-विश्वजीत या संगीतकार जोडीसाठी हाच चित्रपट टर्निंग पॉइंट ठरलाय.
अविनाश-विश्वजीत म्हणजे अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी हे दोन नव्या पिढीचे उदयोन्मुख संगीतकार! संगीताच्या विलक्षण आवडीव्यतिरीक्त या दोघांमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे आणि ती म्हणजे दोघांनीही पुण्यामधल्याच सुप्रसिद्ध कॉलेजेसमधून मिळवलेली डिग्री. तसं पहाता अविनाश खरतर मॅकेनीकल इंजिनियर आहे आणि विश्वजीत बीसीएस ; पण संगीताची ओढ असली कि ती काही तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही आणि तुम्ही आपोआपच या क्षेत्राकडे खेचले जाता. नेमकं हेच या दोघांच्या बाबतीत खर ठरलंय आणि संगीत विश्वावर त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरूवात केलीय देखील!
सिंथेसायजर वाजवण्याची आवड अविनाशला अगदी सुरुवातीपासून आहे.संगीत संयोजक अर्थात म्युझिक अरेंजर म्हणून त्याची विशेष ओळख होती. आजवर त्याने अनेक लाईव्ह शोजसाठी संगीत संयोजनही केलय. सुरेश वाडकर,साधना सरगम, अनुराधा पौडवाल, उदित नारायण, गुलाम आली, श्रेय घोषाल, बेला शेंडे, सावनी शेंडे अशा अनेक गायकांना त्याने आजवर सिंथेसायजरवर साथ केली आहे. आर. डी. बर्मन, मदनमोहन यांच्यावर सादर झालेल्या विशेष कार्यक्रमांच्या संगीत संयोजनात त्याचा मोलाचा वाट होता.
विश्वजीतची सुरुवात पुण्यातील आराधना नाट्यसंघाच्या माध्यमातून एक कलाकार म्हणून झाली. विविध नाट्य स्पर्धांमधून त्याला पारितोषिक मिळतच होती, पण संगीताच वेड त्यालाही स्वस्थ बसू देईना. अखेर त्याने पार्श्वसंगीतापासून करियरला सुरुवात केली. अनेक रेडिओ जिंगल्स आणि विविध नाटकांसाठी त्याने पार्श्वसंगीत दिल. गेल्या अनेक वर्षांपासून रेडिओवर गाजणारे डीएसके समुहाचे `घराला घरपण देणारी माणसं` ही जिंगल देखील त्याचीच!
साधारणत: २००४ पासून विश्वजीत आणि अविनाशने एकत्र काम करायला सुरुवात केली आणि पहाता पहाता या जोडीने आजवर सुमारे पंचवीसहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिलय! त्यात `तुला शिकवीन चांगलाच धडा`, `हाय काय नाय काय`, `समांतर`, `अदला-बदली`, `एक डाव धोबीपछाड` अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. ते करत असतानाच हळू हळू संगीत दिग्दर्शनाकडे त्यांनी आपली दिशा वळवली आणि संगीत दिग्दर्शक म्हणून या दोघांनी आजवर पाच मराठी चित्रपटात काम पाहिलं. त्यात `आईचा गोंधळ`, `मोहिनी`, `सावित्रीच्या लेकी`, `गैर`, आणि `मुंबई-पुणे-मुंबई` या चित्रपटांचा समावेश आहे. आता याचीच पुढची पायरी म्हणून चित्रपटांसह सध्या एका कन्नड चित्रपटावरही त्याचं काम सुरु आहे. चित्रपट एके चित्रपट एवढच त्यांच कार्यक्षेत्र सिमित नाही. `थर्मक्स`, `एअरटेल`, `विप्रो`, `डीएसके`, `बजाज` या सारख्या प्रसिद्ध कंपन्यांच्या जाहिरातींसाठी देखील त्यांनी काम केलं आहे. इ टीव्ही वरील धुमधमाका, स्टार प्रवाह वरील कशाला उद्याची बात तसच साम मराठी वरील वेग या मालिकांची शीर्षकगीते देखील त्यांनीच केली आहेत.
मुंबई-पुणे-मुंबई अगदी आजच्या तरुणाईचा, नव्या पिढीचा चित्रपट आहे. त्यामुळे त्याचं संगीतही नव्या पिढीला आवडेल असच आहे. एकूणच सध्या मराठी संगीतात अनेक बदल वेगाने होत आहेत, याच विषयावरून अविनाश - विश्वजीत बरोबरच्या गप्पांना सुरुवात झाली.
सध्याच्या मराठी संगीतात अनेक बदल वेगाने होत आहेत. तुम्ही याकडे कस पाहता...? "सध्याच्या काळात एकूणच सर्वच प्रकारच्या संगीतावर जागतिक संगीताचा मोठा प्रभाव पडतोय असं निश्चित जाणवतं. एका ठराविक साच्यातलं संगीत ऐकण्यापेक्षा इंटरनेटमुळे जगात संगीत क्षेत्रात काय नवीन गोष्टी सुरु आहेत, याचा आवाका जाणवू लागला आहे. साहजिकच त्यातील नवीन प्रयोग आपल्याकडेही करून पाहायला काय हरकत आहे, असा विचार सध्या अनेकजण करताना दिसतात आणि अर्थात आम्हीही करतोय. स्वाभाविकच आजच्या संगीतात या सगळ्याचं प्रतिबिंब उमटतंय!"
एखाद्या चित्रपटाला संगीत देताना नेमका काय विचार तुम्ही करता? "चित्रपटासाठी संगीत देताना, त्याच्या विषयानुरूप संगीत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे एखादा चित्रपट थ्रिलर असेल किंवा एखादा चित्रपट रोमांटीक असेल, तर त्यानुसारच संगीताचा ढाचा साधारणत: काय असावा हे आम्ही आधी ठरवतो. चित्रपटाच्या विषयाला चपखल बसेल असच संगीत असलं म्हणजे ते रसिकांच्याही पसंतीसही सहज उतरत. तसंच काही वेगळे प्रयोग करतानाही ते, नक्की चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना रुचतील का, याचा बारकाईने शंभरवेळा तरी विचार करण आवश्यक ठरतं. मुंबई-पुणे-मुंबईचं संगीत आम्ही याचप्रकारे दिलयं. स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, ह्रिषीकेश रानडे यांनीही त्यात खूप अप्रतिम गायलंय! या चित्रपटाच्या मराठी पारंपारिक संगीताचा बाज आहेच, पण त्याच बरोबर काही नवीन प्रयोग देखील करून पाहिले आहेत आणि या सगळ्यांनी मिळून जे रसायन तयार झालय ते रसिकांच्या पसंतीस उतरलं याचा आम्हाला आनंद आहे!"
मराठीत प्रायव्हेट म्युझिक अल्बम्सना सध्या यश मिळू लागलय. तुमचा अल्बम रसिकांना कधी ऐकायला मिळेल? "मराठीमध्ये प्रायव्हेट म्युझिक अल्बम्स ही संकल्पना सध्या ब-यापैकी रुजायला लागली आहे! आगामी काळात याच महत्व नक्की वाढेल असा विश्वास वाटतो. हे सगळ चित्र सुखावणारं असल्याने आगामी वर्षभराच्या कालावधील आम्हीसुद्धा एक अल्बम घेऊन येत आहोत. गणपती बाप्पाच्या गाण्यांवरच्या या अल्बमसाठी सध्या तयारी सुरु केली आहे. सध्यातरी याबद्दल इतकच सांगू शकतो! Keeping our fingers crossed ! :) "
अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेल्या काही खास गाण्यांची झलक आम्ही तुमच्यासाठी येथे देत आहोत. तुम्हाला ती आवडतील अशी आम्हाला खात्री आहे.
गीत : कधी तू... [ चित्रपट : मुंबई पुणे मुंबई ]
गीत : का कळेना [ चित्रपट : मुंबई पुणे मुंबई ]