Advertisement
झी मराठी वाहिनीवर नुकत्याच संपलेल्या कळत-नकळतचे 'टायटल साँग' असो किंवा सध्या सर्वाधिक गाजत असलेल्या कुलवधू सिरीअलचे गाणे असो, दोन्ही गाणी अगदी सर्व प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहेत. गम्मत म्हणजे, या दोन्ही गाण्यांचा संगीतकार एकच आहे आणि तो म्हणजे निलेश मोहारीर!
सलग दोन वर्ष त्याने 'सर्वोत्कृष्ट टायटल साँगचा 'झी मराठी'चा पुरस्कारही पटकावलाय. ए. आर. रहेमानला आदर्श मानणारा हा उदयोन्मुख कलावंत त्याच्यासारखाच 'हटके' मार्गाने स्वत:चं स्थान निर्माण करू पाहतोय.
आसपासच्या इतर संगीतात त्याचं संगीत नेहमीच वेगळं आणि उठून दिसतं. त्याची या क्षेत्रातील एंट्री अगदी लहानपणापसून झाली असं मात्र म्हणता येणार नाही. कारण, शाळेत असताना त्याला आपल्यासारखाच गाणी ऐकण्याचा छंद होता. कॉलेजमध्ये आल्यावर मात्र स्थिती बदलली. रेहमानच्या गाण्यांनी त्याला अंतर्बाह्य हलवलं. आपणही अशीच नवनिर्मिती केली पाहिजे हा एकच ध्यास त्याने घेतला. त्यातूनच मग त्याने मुंबई विद्यापीठातून 'म्युझिक डायरेक्शन' आणि 'साउंड रेकोर्डिंग' यातलं शिक्षण घेतल. याच दरम्यान त्याने किराणा घराण्याचे मनोहर जोशी यांच्याकडून शास्त्रीय संगीत, तर अनिल मोहिले आणि अच्युत ठाकूर यांच्याकडून 'लाईट म्युझिक'चही प्रशिक्षण घेतलं. गान-सरस्वती किशोरी आमोणकर यांच्याबरोबर काही कार्यक्रमात त्याला 'कि-बोर्ड' ची साथ करायला मिळाली, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं, अशी त्याची कृतज्ञ भावना आहे. सागरिका आणि कृणाल म्युझिक बरोबर काही अल्बम केल्यावर त्याला पहिला मोठा ब्रेक मिळाला, केदार शिंदेच्या 'यंदा कर्तव्य आहे' या चित्रपटात. त्यातील राहुल वैद्यने गायलेलं 'आभास हा' हे त्याचे गाणं सर्वाधिक गाजलं आणि त्या नंतर निलेशन मागे वळून पाहिलंच नाही. २००७ मध्ये 'कळत-नकळत' आली आणि त्याच्याकडे मालिकांचा ओघच चालू झाला. मग, काही चित्रपटात पुन्हा संधी मिळाली. त्या बरोबरीने एका बाजूला अल्बमचे कामही जोरात सुरु होतेच. अतिशय अल्पावधीत निलेश एकदम बिझी झाला आहे. सध्याच्या तरुण संगीतकारांमध्ये, सर्वाधिक वैविध्यपूर्ण काम करणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये त्याच नाव अग्रक्रमान घ्यावं लागेल, यात शंका नाही. त्यामुळे 'ब्राईट फ्युचर' म्हणून त्याच्याकडे आणि त्याच्या कामाकडे पहायला हवं. संगीत देण्याच्या त्याच्या अनोख्या शैलीमुळेच अनेक नामवंत गायक-गायिकांनी त्याच्याकडे काम केल आहे. सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, श्रीधर फडके, उत्तरा केळकर, साधना सरगम, रवींद्र साठे, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, देवकी पंडित, अभिजित सावंत आणि ही यादी एवढ्यावरच थांबत नाही तर, उषा मंगेशकर आणि शंकर महादेवन पण त्यात आहेत. जुन्या-नव्या सर्व कलावंतांसह काम करणारा हा एक हरहुन्नरी संगीतकार म्हणूनच विविध पुरस्कारांचा मानकरीही ठरलाय. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावी लागतील असे पुरस्कार आहेत......
वेगळ्या वाटेने जाणारे लोकं अनेकदा यशस्वी ठरतात, असं दिसतं. त्या पंक्तीत काही दिवसात निलेश जाऊन बसला तर आपल्या कोणालाच आश्चर्य वाटायला नको. कारण, त्याचं कामच त्याला सर्वोच्च शिखरावर नेईल, याची खात्री त्याची आजवरची वाटचाल बघून नक्की देता येईल.
कळत-नकळत हा निलेशच्या आयुष्यातला 'टर्निंग पॉईंट' ठरलाय, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यामुळे आमच्या गप्पांना सुरुवात त्यापासूनच झाली.... कळत-नकळतसाठी खूप मेहनत घेतली होतीस. त्याचं चीज झालं असं वाटतं का? 'फर्स्ट लिसनर'ला ते गाण आवडावं अशी आमची सुरुवातीपासून इच्छा होती. त्यामुळे त्या गाण्यासाठी पुरेसा वेळ देऊनच त्यावर काम केल होतं. त्या गाण्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे खूप आनंद मिळाला. ते गाणं जेंव्हा पूर्ण झालं तेव्हाच ते लोकांना आवडेल याची खात्री वाटत होती, पण त्याला लोक इतकं उचलून धरतील अस स्वप्नातही वाटलं नव्हत, हे मात्र खर. लहान-लहान मुलही येऊन जेव्हा आजही त्या गाण्याचं आख्खं कडवं म्हणून दाखवतात, तेव्हा त्याची प्रेक्षकांमधील 'क्रेझ' लक्षात आल्यावाचून रहात नाही. त्या दरम्यान इतर मालिकांपेक्षा हे गाणं खूपच 'कॅची' वाटल्याचं, अनेक प्रेक्षकांनी आवर्जून सांगितलं.
अनेक मालिकांप्रमाणे तू अल्बममध्ये ही खूप काम केल आहेस. तुला जास्त काय आवडतं? मालिकांनी मला माझी स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली आहे, यात शंका नाही. मात्र तरीही मला मनापासून असं वाटत की, मालिका आणि चित्रपट यापेक्षा अल्बमसाठी काम करण्यात एक वेगळंच थ्रिल आहे. म्हणजे कसं होतं ना की, चित्रपट आणि फ़िल्म करताना आपल्याला त्या त्या संबंधित विषयाशी बांधील राहूनच काम करावं लागतं, पण अल्बममध्ये अशी परिस्थिती नसते. तुम्ही तुमचे राजे असता. एकतर अनेक अल्बममध्ये विषयाचं असं काही बंधन नसत. त्यामुळे प्रयोग करून पाहायला संधी असते. तुम्ही तुम्हाला हवा तसा वेळ घेऊन काम करू शकता, हे आणखी एक वैशिष्ट्य!
रहेमानला तू आदर्श मानतोस म्हणून हा प्रश्न की, स्वत:ला तू १०-१५ वर्षांनी कुठे पाहतोस? खरं सांगू का.... मी फार पुढचा विचार नाही करत . आपल्याकडे जे काम आहे, ते मन लावून, प्रामाणिकपणे करावं, याकडे माझा जास्त ओढा आहे. आणि मुळातच असं आहे ना की, रहेमाननी हिंदीत येण्याआधी त्यांच्याकडील प्रादेशिक चित्रपटात अनेक वेगवेगळे प्रयोग केले होते आणि त्या प्रेक्षकांनी ते आनंदाने स्वीकारलेही. त्यामुळेच, आगामी काळात, मालिका असो व चित्रपट, माझाही हाच प्रयत्न राहील की लोकांना, रसिक श्रोत्यांच्या कानापर्यंत काही वेगळ्या सुरावटी पोचवता याव्या. त्यासाठी आजवर जसा रसिकांचा भरभरून आशीर्वाद लाभला, तसाच या पुढेही कायम राहावा हीच अपेक्षा आहे.
निलेशने संगीत दिग्दर्शन केलेल्या काही लोकप्रिय गाण्यांचे व्हिडीयोस आणि त्याच्या नवीन अल्बम्समधली निवडक गाणी खास मानबिंदूच्या रसिकांसाठी इथे देत आहोत. तुम्हाला ती नक्कीच आवडतील.
Videos
Audio
कुछ यारी कुछ मस्ती : स्वप्नील बांदोडकर, योगिता चितळे ( अल्बम लाईफ़ इज ब्युटीफ़ूल )
ये ना जरा : योगिता चितळे ( अल्बम लाईफ़ इज ब्युटीफ़ूल )
ऊठ ऊठ पांडुरंगा : आरती अंकलेकर ( अल्बम भगवंताचे देणे)
दर्या सारंगा : योगिता चितळे ( अल्बम लाईफ़ इज ब्युटीफ़ूल )
तुझ्या उराच्या घरट्या मध्ये : अल्बम विंदानुभूती