Advertisement
शास्त्रीय संगीताप्रमाणेच नाट्यसंगीत, भावगीत, भजन, टप्पा, ठुमरी, दादरा, होरी अशा अनेकविध संगीत प्रकाराची उत्तम जाण असणारा हा नव्या पिढीचा 'आजचा आवाज' जणू!ललित कला केंद्रातून 'संगीत' क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीचं शिक्षण सध्या घेत असतानाच, संगीतासह इतर कलांचाही आनंद मनमुराद लुटणारा मनस्वी कलावंत म्हणजे पुष्कर लेले.
पुष्करबद्दलची सगळीच माहिती इथे देणं शक्य होत नसल्याने अधिक माहितीसाठी इच्छूकांनी www.pushkarlele.com या त्याच्या पर्सनल वेबसाईटला भेट द्यावी!
"सध्या सुरु असणारया विविध स्पर्धांमधून खरोखरी टॅलेंट हंट होतं का? तुला काय वाटतं? ""(मिश्कील हसून) अरे माझ्याकडेच बघ ना! लहानपणापासून विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊनच मी पुढे आलोय. तिथे गाणं कस गायचं हे शिकलोय, त्याच प्रमाणे कसं गाऊ नये हे देखील समजून घेतलय. मात्र आज-कालच्या संगीत स्पर्धांबद्दल म्हणशील, तर नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसं या स्पर्धांचं झालं आहे. आजवर अप्रसिद्ध राहिलेलं, जगासमोर न आलेलं, टॅलेंट नक्कीच प्रकाशात येतंय. मात्र या स्पर्धा, त्यांचं आयोजन, त्यातील रंगत, हे सगळ नुसतं दिखाऊ झालं आहे, असं मला नक्कीच वाटत. या आता स्पर्धा राहिल्या नसून केवळ रीऍलीटी शो उरले आहेत का, ही खंत मनाला चुटपूट लावते."
"शास्त्रीय संगीताऐवजी इतर कोणत्या गायन प्रकारात करियर करावंसं वाटलं नाही का ?" हा माझा प्रश्न विचारून पूर्ण होण्याआधीच पुष्करचं स्पष्ट आणि सडेतोड उत्तर मिळालं. तो म्हणतो..."तुला खरं सांगतो, शास्त्रीय संगीत हे माझ पाहिलं प्रेम आहे आणि ते यापुढील काळात देखील कायम राहील."
"विविध ठिकाणी कार्यक्रमांचं सादरीकरण, संगीत क्षेत्रातील शिक्षण याशिवाय आगामी काळातील कोणत्या योजना आहेत. त्यावर प्रकाश टाकू शकशील ?" "हो नक्कीच! गंधार स्कूल ऑफ़ म्युझिक ही संस्था मी लवकरच सुरू करतोय. यामागचं मुख्य कारण असं की सध्या संगीत शिकण्या/शिकवण्यासाठीचे उपलब्ध पर्याय आपण पाहिले तर त्यात दोन वेगळे टोकाचे प्रवाह तुला दिसतील. यामध्ये एकीकडे एखाद्या मोठ्या संस्थेशी निगडीत ब-याच छोट्या खाजगी संस्था, त्यांनी सोप्पा केलेला आणि साचेबद्ध अभ्यासक्रम शिकवतात आणि दुसरीकडे संगीताची मोठमोठी विद्यापीठं आहेत, जिथे शिकवलं जाणारं संगीत बरच व्यापक असून, फार theoretical आणि समजण्यास अवघड असं असतं. या दोघांचा सुवर्णमध्य साधण्याची आज कुठेतरी गरज आहे आणि नेमका हाच प्रयत्न मी माझ्या या संस्थेतर्फे करतोय... प्रथमच संगीत शिकू इच्छिणा-या विद्यार्थ्यांपासून ते advance लेव्हलच्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांनाच इथे शिकवलं जाईल. तसच संगीताच्या एखाद्या विशिष्ट विभागात प्राविण्य मिळवू इच्छिणा-यांसाठीही त्यांचासाठी असे वेगळे आणि personalised सेशन्स डिझाईन केले जातील. या व्यतिरीक्त चर्चा, दिग्गज कलावंतांची साथसंगत आणि त्यांनी केलेल्या सादरीकरणातून शिकणं ही मी सुरु करत असलेल्या गंधार स्कूल ऑफ़ म्युझिक ची प्रामुख्याने वैशिष्ट्य असतील "
पुष्करने आत्तापर्यंत असंख्य मैफीली सादर केल्या आहेत. त्यापैकी काहींचे ऑडीयो / व्हिडीयोस खास मानबिंदूच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी ती एक मेजवानीच असणार आहे!