दिग्दर्शक : विक्रम गोखले । कलाकार : विक्रम गोखले, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम देसाई, सुहास जोशी, दीपा श्रीराम, अरुण नलावडे, माधव अभ्यंकर, अनिकेत विश्वासराव, नंदीनी जोग, स्मिता तांबे, अनंत जोग, मनोज जोशी, डॉ. अमोल कोल्हे, विद्याधर जोशी, शशांक शेंडे, सुरेखा कुडची, किरण करमरकर, वृषाली गोखले, किरण कुमार आणि अन्य । संगीत : नरेंद्र भिडे । कथा : डॉ. नितीन लवंगारे । पटकथा : समीर विद्वांस । संवाद : समीर विद्वांस, क्षितीज पटवर्धन । निर्माते : मोहन दामले, संजय साठ्ये, श्रीराम दांडेकर
आघात हा विक्रम गोखले यांनी दिग्दर्शीत आणि अभिनीत केलेला चित्रपट २४ डिसेंबर २०१० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत होतोय. या चित्रपटात कांदबरी कदम देसाई हिने या चित्रपटात संगीता प्रधान नामक एका बावीस वर्षीय तरुणीची भूमिका निभावली आहे. लग्नाआधीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्या गर्भाशयामध्ये गाठ असल्याच निदान होतं आणि तिला नवजीन हॉस्पिटलमधल्या प्रसिद्ध तज्ञ डॉ.खुराणा यांच्याकडे पाठवलं जातं. प्राथमिक तपासणीनंतर एका छोट्या ऑपरेशनंतर गाठीचं निदान होईल असं डॉ.खुराणा तिला सांगतात.ऑपरेशन बाबत असलेल्या भयानक भितीमुळे संगीता ऑपरेशन करण्यास प्रथम नकार देते, पण रेसिडेन्ट डॉ.स्मिता देशमुख (मुक्ता बर्वे) आणि मानसोपचार तज्ञ सुरेन जोशी तिला धीर देतात.
सुरुवातीला अगदी साध्या वाटणा-या या ऑपरेशन दरम्यान डॉ.खुराणा संगीताच्या शरीरातील संशयास्पद वाटणारे काही भाग आपल्या अनुभवाच्या आधारावर वैद्यकीय तपासणी न करताच काढण्याचा निर्णय घेतात आणि तसं करण्यास डॉ.स्मिता देशमुख हिला सांगतात.पण याचा दुरगामी परिणाम संगीताच्या आयुष्यावर होणार असल्याने ऑपरेशनमध्ये सहभागी असलेली डॉ.स्मिता देशमुख त्यांना आधी वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला देते व ते भाग काढण्यास नकार देते. नवख्या डॉक्टरने केलेल्या या घटनेने डॉ.खुराणांचा अहंकार भयंकर दुखावला जातो आणि दुस-या डॉक्टरला सांगून ते भाग डॉक्टर खुराणा ते भाग काढुन टाकतात.ऑपरेशन नंतरच्या तपासणीत काढून टाकलेले भाग निरोगी असल्याचं सिद्ध होतं पण ते भाग काढून टाकल्याने संगीता कधीच आई बनू शकणार नसते. डॉ स्मिता देशमुखना आता हे सहन होत नाही आणि ती हे प्रकरण उचलून धरते,परिणामी डॉ.खुराणा आणि डॉ.स्मिता देशमुख द्वंद्व पेटतं! या सगळ्या संघर्षाचं, पर्यायाने माणसातल्या सैतानाचं आणि डॉक्टरांमधल्या माणूसकीचं अतिशय प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे.
आघात या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम गोखलेंसारख्या दिग्गजाने केलय यातच सारं काही आलय आणि सोबतीला मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, अरुण नलावडे, अनंत जोग, अनिकेत विश्वासराव, सुहास जोशी, मनोज जोशी, किरण कुमार अशा कसदार अभिनय करण्यासाठी प्रसिद्ध असणा-या कलावंतांचा सहभाग असल्याने अप्रतिम टीमवर्क या चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळणार हे निश्चित!
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काही रुग्णांना आपला जीव गमावायला लागल्याच्या बातम्या मध्यंतरी वर्तमानपत्रातून वाचायला मिळाल्या होत्या, त्यावर उद्वेगाने रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या बातम्या देखील प्रसारीत झाला होत्या.या चित्रपटाची रुपरेषाही समांतर धरतीवर आधारली आहे.विक्रम गोखलेंसारख्या अत्यंत अभ्यासू वृतीच्या दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्याने या विषयाचे अनेक धागेदोरे/विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट "A Must Watch" या सदरात मोडतो हे निश्चित !