संकल्पना
ओंकार गणेश हा गायक, संगीतकार यांचा प्रसिद्ध होणारा १४ वा अल्बम असून तो
मानबिंदू म्युझिक तर्फे आपल्यासमोर आणताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
सध्याच्या काळात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके संगीतकार मेलोडीयस चाली
देण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि अभिजीत राणे हे नाव त्यात अग्रकमाने येतं. त्यामुळे
ओंकार गणेश हा अल्बमदेखील त्याच पंक्तीत मोडतो हे काही नव्याने सांगायची आवश्यकता नाही. या अल्बमध्ये श्री गणेशावर आधारीत आठ भक्तीगीतांचा समावेश आहे.
अल्बममधली बरीचशी गाणी पारंपारीक, शास्त्रीय अंगाने जाणारी असून गणेशोत्सवातील मंगल
वातावरणाची निर्मिती या गाण्यांद्वारे होते. या
गाण्यांबरोबरच "हे सुखकारा" हे पूर्वीच्या
लोकगीताचं आठवण करून देणारं गाणं आणि गाण्याच्या ठेक्या बरोबर तालं धरायला लावणारं
"हे मोरया" ही गाणी देखील
ओंकार गणेश
मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील.
या अल्बमसाठी वेगवेगळ्या आठ गीतकारांनी गीतलेखन केलं असून यातील अनेक
गीतकारांबरोबर अभिजितने या पूर्वीही काम केलं आहे. या गीतकारांमध्ये
सारे
तुझ्यात आहे या अल्बमच्या गीतकार जयश्री अंबासकर,
गंध हलके हलके या अल्बमची गीतकार प्राजक्ता पटवर्धन तर
मनधुंद
या अल्बमचा गीतकार अखिल जोशी यांचाही समावेश आहे.
संगीतकार म्हणून अभिजीत राणेंचं नाव आपल्याला माहित आहेच पण तितकाच ताकदीचा,
सुरेल आणि मुरलेला गायक सुद्धा त्यांच्यात आहे हे ओंकार गणेश या अल्बमद्वारे
आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. गळ्यातून सहज जाणा-या ताना, खटके आणि भक्तीगीतांना
आवश्यक असणारं आर्जव हे त्यांच्या आवाजात ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.
"रुणझुणला" हे शास्त्रीय अंगाने जाणारं देखील अभिजीतने केवळ एकाच टेक मध्ये रेकॉर्ड
केलं आहे. यातच त्यांचामधला गायक किती कसलेला आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो.
एकूणच काय तर ओंकार गणेश या अल्बमधील गाणी या गणेशोत्सवात आपल्या घरात किंवा
घराजवळील मंडळात वाजली तर गणेशोत्सवाचा आपला आनंद नक्कीच द्विगुणीत होईल
हे मात्र नक्की!